9 January 2012

चित्रपट महोत्सव कशासाठी हवेत?


चित्रपट म्हणजे निव्वळ दोन घटका करमणुकीचं साधन न मानता गांभीर्यानं आस्वाद घेण्याची ती एक सशक्त अभिव्यक्ती आहे, आणि देशोदेशीचे चित्रपट पाहून आपल्या जाणिवा विस्तारता येतात असं मानणारा रसिकवर्ग महाराष्ट्रात कित्येक दशकांपासून आहे. पन्नासहून अधिक वर्षं कार्यरत असणाऱ्या फिल्म सोसायट्यांनी हा प्रेक्षकवर्ग जोपासला आहे. सरकारतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पूर्वी काही निवडक शहरांत भरत असे. दूरदर्शन हे एकुलतं एक दूरचित्रवाणी माध्यम लोकांच्या घरात स्थिरावल्यानंतर, म्हणजे ऐंशीच्या दशकात त्यावरून रात्री उशिरानं देशोदेशीचे रसिकमान्य चित्रपट दाखवले जाऊ लागले. सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या अशा मर्यादित पर्यायांचा मर्यादित फायदा चित्रपटरसिकांना तेव्हा होत असे.  गेल्या काही वर्षांत मात्र दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी अनेकविध पर्याय उपलब्ध झाले. आजच्या या वातावरणात चित्रपट महोत्सव काही वेगळं देऊ शकतात का, याचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे.

संगणक आणि इंटरनेट यांचा वापर गेल्या दहापंधरा वर्षांत पुष्कळ वाढला. त्याच काळात व्हिडिओफितींचा जमाना संपून डीव्हीडीवर चित्रपट उपलब्ध होऊ लागले. संगणकाचा वापर करून चित्रपटांच्या प्रती काढणं सहजसोपं झालं. हॉलिवूडच्या रंजनप्रधान चित्रपटांपेक्षा वेगळे परदेशी चित्रपट दाखवणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्या काही वर्षांपासून आपल्याकडे दिसू लागल्या. चित्रपटांची चाचेगिरी (पायरसी) ही तर आता जागतिक स्तरावरची एक समांतर वितरणव्यवस्थाच आहे. थायलंड, चीन अशा देशांत आधी फोफावलेली ही बाजारपेठ-व्यवस्था आता आपल्याकडेही आली आहे. कोणत्याही वितरण माध्यमातून आतापर्यंत उपलब्ध नसणारे अनेक चित्रपट या वैध-अवैध माध्यमांद्वारे आता घरबसल्या पाहता येतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकांना उपलब्ध असलेल्या चित्रपटांमध्ये क्रांतिकारक म्हणता येईल इतकं वैविध्य आणि ताजेपणा आता आला आहे. हाय-डेफिनिशन दूरचित्रवाणी संच, होम थिएटर वगैरे सुविधांमुळे घरी बसून चित्रपट पाहण्याचा अनुभवही पूर्वीपेक्षा अनेकपटींनी सरस झाला आहे.

या वातावरणात चित्रपट महोत्सवांचं काय स्थान आहे? निव्वळ एकाच सरकारी महोत्सवाचे दिवसही गेल्या काही वर्षांत सरले. थंडीची चाहूल लागली की आता महोत्सवांचा मोसम सुरू होतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे लहानमोठे चित्रपट महोत्सव आता भरतात. वैध वितरणव्यवस्थेतून कायदेशीररीत्या उपलब्ध होणारे चित्रपटच यांत दाखवता येतात. जागतिक तेजी-मंदी, भारतातल्या उद्योगांची आर्थिक स्थिती, केंद्र किंवा स्थानिक शासनाची वेळोवेळी बदलती आर्थिक-सांस्कृतिक धोरणं, त्यांनुसार खाजगी अथवा सरकारी प्रायोजकांकडून उपलब्ध होणारा (किंवा न होणारा) निधी आणि इतर मदत यांमुळे काही अंगभूत मर्यादा अशा चित्रपट महोत्सवांना पडतात. त्यांचा जीव इतका छोटा असतो की कान-बर्लिन-व्हेनिससारख्या जगप्रसिद्ध महोत्सवांशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. तरीही महोत्सवांची संख्या आणि ते आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रातल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. त्यांना अधिकाधिक गर्दी होते आहे असंही लक्षात येतं. यामागे काय कारणं असू शकतील?

घरी चित्रपट पाहायच्या साधनांमध्ये जसा गुणात्मक फरक पडला तसा तो मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याच्या साधनांतदेखील पडला. आजच्या मल्टिप्लेक्समधल्या प्रोजेक्शनचा किंवा ध्वनियंत्रणेचा दर्जा हा पूर्वीहून खूपच चांगला असतो. महागड्या होम थिएटरमध्येदेखील त्या तोडीचा अनुभव मिळत नाही. चकचकीत निर्मितीमूल्यं, डोळे दिपवणारे स्पेशल इफेक्ट्स आणि दणदणीत आवाज यांचा भडिमार करणाऱ्या व्यावसायिक चित्रपटांपेक्षा वेगळे असे महोत्सवातले चित्रपट पाहताना हा फरक अधिक प्रकर्षानं जाणवतो. छायालेखन, ध्वनिलेखन, प्रकाशयोजना अशा तांत्रिक बाबींवर कष्ट घेतल्यामुळे अनेकदा चित्रपटाच्या संहितेला आणि आशयाला उठाव मिळतो. असा उठाव देणारे चित्रपटातले बारकावे मोठ्या पडद्यावर अधिक परिणामकारक ठरतात. आतापर्यंत बालिश करामतींसाठीच प्रसिद्ध असलेल्या ३-डी तंत्रज्ञानाचा सकस अभिव्यक्तीसाठी वापर करण्याचा नवा पायंडा विम वेंडर्स आणि वेर्नर हर्झॉग या रसिकमान्य दिग्दर्शकांनी आता पाडला आहे. अशा कारणांमुळे दर्जेदार चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं हा अजून तरी अधिक सरस अनुभव आहे.

आपले महोत्सव छोट्या जिवाचे असण्याचे काही अनपेक्षित लाभही असतात. आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिव्हल सर्किट’मध्ये तुलनेनं अपरिचित असणाऱ्या पण नेटानं चांगला सिनेमा बनवणाऱ्या अनेक दिग्दर्शकांचे चित्रपट अशा महोत्सवांमध्ये पाहायला मिळतात. दहा वर्षांपूर्वी एका महोत्सवात आंद्रेआस ड्रेसेन या जर्मन दिग्दर्शकाचे काही सुरेख चित्रपट पाहायला मिळाले होते. काही वर्षानंतर, म्हणजे त्याला काही प्रतिष्ठित पाश्चात्य महोत्सवांत पारितोषिकं मिळाल्यानंतर ‘ताज्या दमाच्या जर्मन सिनेमाचा एक प्रणेता’ म्हणून पश्चिमेत त्याची दखल घेतली गेली. भारतात बसून त्याचं महत्त्व आम्हाला तुमच्याआधीच जाणवलं होतं अशी शेखी तेव्हा मिरवता आली ती केवळ आपल्या महोत्सवांत त्याचे चित्रपट अगोदरच दाखवले गेले असल्यामुळे.

इंटरनेटच्या धोधो वाहणाऱ्या नळातून जगभरातले हजारो चित्रपट गळत असताना महोत्सवांना होणाऱ्या गर्दीमागचं एक कारणही या अपरिचित पण दर्जेदार चित्रपट पाहण्याच्या संधीमध्ये असू शकेल असं वाटतं. न्यूयॉर्क-लंडनमध्ये प्रदर्शित झालेल्या किंवा कान-बर्लिनसारख्या महोत्सवांत गाजलेल्या चित्रपटांविषयीची माहिती परदेशी प्रसारमाध्यमांद्वारे मिळत राहते आणि ते चित्रपट वैध-अवैध मार्गांनी उपलब्धही होतात. आपल्याकडच्या महोत्सवांत पाहायला मिळालेल्या चांगल्या चित्रपटांना मात्र अनेकदा एवढी प्रसिद्धी मिळालेली नसते. २००८चा ‘लेक टाहो’ हा मेक्सिकन चित्रपट किंवा २००४चा ‘डेज ऑफ सांतियागो’ हा चिलीचा चित्रपट अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. हे चित्रपट उपलब्ध असले तरीही त्यांविषयी पुरेशी माहिती मिळाल्याशिवाय ते रसिकांपर्यंत पोहोचणारच नाहीत. ही पोकळी भरून काढण्याचं महत्त्वाचं काम चित्रपट महोत्सव करतात.

पुण्यासारख्या शहरात एफ.टी.आय.आय. ही चित्रपटविषयक शिक्षण देणारी राष्ट्रीय संस्था किंवा नॅशनल फिल्म आर्काइव्हमधला चित्रपटांचा संग्रह उपलब्ध असल्यामुळे तिथे अनेक वर्षं चित्रपट संस्कृती रुजली आहे. पण आता महाराष्ट्रातल्या इतर अनेक गावांतसुद्धा अ‍ॅनिमेशन, मास कम्युनिकेशन, दूरचित्रवाणी, नाटक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत करियर करू इच्छिणाऱ्या तरुणांना शिक्षण देणाऱ्या संस्थांची वाढ झालेली दिसते. तिथे शिक्षण घेणारे किंवा घेऊ इच्छिणारे होतकरू तरुण, हौशी नाट्यकर्मी किंवा कलेचे विद्यार्थी यांची गर्दी चित्रपट महोत्सवांकडे वळताना दिसते. चित्रपट माध्यमात नवीन काय घडतं आहे हे जाणून घेण्याची आस, महोत्सवात येणाऱ्या चित्रपट आणि इतर दृश्यमाध्यमांशी संबंधित व्यक्तींशी ओळख करून घेऊन त्याद्वारे काही संधी उपलब्ध होतात का ते पाहणं असे अनेक हेतू त्यामागे असतील. ज्यांनी आपल्या चित्रपटविषयक जाणिवा विस्तारल्या आहेत असे अनेक तरुण आता मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मुख्य प्रवाहात गणले जातील असे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत रूढ चौकटीहून वेगळ्या आणि ताज्या वाटा चोखाळत आहेत आणि व्यावसायिक-कलात्मक हा पूर्वीचा द्वंद्वात्मक वर्गभेद नाहीसा करत आहेत. महोत्सवांत पाहिलेल्या देशोदेशीच्या चित्रपटांचा प्रभाव याला काही प्रमाणात जबाबदार आहे.

चित्रपट महोत्सवांत आढळणारा आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे तिथलं सळसळतं चैतन्य. एखाद्या गाजलेल्या चित्रपटासाठी उत्साहानं अर्धा तास रांगेत तिष्ठत उभे राहणारे ज्येष्ठ नागरिक इथे दिसतात. मोबाईल वापरता वापरता अधूनमधून जमेल तसा चित्रपट पाहणाऱ्या एखाद्या तरुणाला इतर तरुणांकडून ‘आता बास!’ अशी दटावणीयुक्त समजसुद्धा इथे मिळते. अमेरिकन अ‍ॅस्पेक्ट रेशिओपेक्षा वेगळ्या आकारातले परदेशी चित्रपट प्रोजेक्ट करताना मल्टिप्लेक्सच्या प्रोजेक्शनिस्टची भंबेरी उडली तर त्याला मदत करणारे उत्साही विद्यार्थीसुद्धा इथे पाहायला मिळतात. कोणते चित्रपट पाहायचे यासाठी एकमेकांचे सल्ले घेण्यासाठी किंवा आवडलेल्या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी ओळखीची आवश्यकता भासेनाशी होते. न कळलेल्या चित्रपटाविषयी कुणी काही सांगत असेल तर श्रवणभक्ती करत उभ्या असलेल्या एखाद्या कोंडाळ्यात लोक सहज सामील होतात. आपली समज आणि जाणीव विस्तारण्याची जबाबदारी शेवटी चित्रपट रसिकाला स्वत:च घ्यावी लागते, पण महोत्सवांच्या वातावरणामुळे त्याला मदत नक्कीच होते. चित्रपट महोत्सवांना भरभरून प्रतिसाद देणाऱ्या रसिकांची वयं, त्यांची आवडनिवड किंवा चित्रपटविषयक जाण अशा अनेक बाबींमध्ये मोठे फरक असतात. अन् तरीही वर उल्लेख केलेले मुद्दे पाहता हे जाणवतं की त्यांना एकत्र यावंसं वाटावं यासाठी अनेक भरभक्कम कारणं हे महोत्सव पुरवत आहेत आणि तीच आपल्या चित्रपट महोत्सवांची ताकद आहे.

पूर्वप्रकाशन: लोकसत्ता रविवार, ८ जानेवारी २०१२: चित्रपट महोत्सव कशासाठी हवेत?

13 November 2011

जनांचा प्रवाहो - मराठीचं महाजाळं

फेसबुक, ट्विटर यांसारखी संकेतस्थळं गेल्या काही वर्षांत चांगलीच फोफावली आहेत. ‘सोशल नेटवर्किंग’ हा शब्द एकेकाळी समाजशास्त्र या ज्ञानशाखेत जनसमूहांच्या आपसांतल्या संबंधांच्या विश्लेषणासाठी वापरला जात असे; आज तो फक्त फेसबुक आणि ट्विटरच्या संदर्भातच वापरला जातो, असं म्हणता येईल. स्वत:च्या घटस्फोटाची (किंवा ‘ब्रेक अप’ची) जाहीर वाच्यता करण्यापासून राजकीय क्रांती घडवून आणण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी आज हे नवं सामाजिक संवादजाळं वापरलं जात आहे. पाश्चात्य जगामध्ये त्याबद्दल पुष्कळ विश्लेषण आणि चर्वितचर्वणदेखील होत आहे. याला समांतर असं एक मराठीजनांचं संवादजाळं आहे. आजकाल मराठी जगात त्याची दखल घेतली जात आहे, पण त्याचं विश्लेषण मात्र फारसं होताना दिसत नाही. या लेखात या समांतर जगाचा थोडा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मिसळपाव, उपक्रम, मायबोली, मनोगत, ऐलपैल, मी मराठी अशा नावांची संकेतस्थळं सध्या पुष्कळ लोकप्रिय आहेत. जगभरातले हजारो मराठीभाषक यांचे सदस्य आहेत. त्यांना विविध विषयांवर गद्य-पद्य लिखाण इथे करता येतं. मोठ्या सदस्यसंख्येमुळे आपोआप त्या लिखाणाला मोठा वाचकवर्ग मिळतो. अनेक उत्साही सदस्यांच्या प्रतिक्रियांमुळे ही स्थळं गजबजलेली असतात. कोणत्याही संवादमाध्यमातून होणाऱ्या अभिव्यक्तीमधून त्या त्या समाजाचं काहीएक चित्र उभं राहत असतं. मराठी संवादस्थळांमधून मराठी समाजाचं जे चित्र उभं राहतं त्याचा आढावा या लेखात घेतलेला आहे.



पुढे वाचा:


Open publication - Free publishing - More culture 

('प्रहार' दिवाळी अंक २०११ येथे पूर्वप्रकाशित)

लेखाचा वरचा दुवा दिसण्यात काही अडचण आल्यास हा दुवा वापरावा: http://independent.academia.edu/AbhijeetRanadive/Papers/1138749/Marathi_Social_Network_-_An_overview

18 July 2011

"चिडून उठा!" - गाजणारं पुस्तक


फ्रान्समध्ये गेले काही दिवस एक पुस्तक प्रचंड गाजतं आहे. ९३ वर्षांच्या एका वृद्ध गृहस्थांनी ते लिहिलं आहे. स्तेफान हेसेल हे त्याचे लेखक एक असामान्य व्यक्ती आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीनं फ्रान्स पादाक्रांत केलेला असताना लंडनमधून जर्मनांच्या विरोधात चळवळ चालवणाऱ्या आणि नंतर स्वतंत्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या जनरल द गॉल यांचे ते चळवळीतले विश्वासू सहकारी होते. जर्मनांनी त्यांना पकडून त्यांची रवानगी छळछावणीत केली होती. तिथे डांबल्या गेलेल्या लाखो लोकांप्रमाणे हेसेल यांचंही मरण निश्चित होतं, पण ते शिताफीनं पळाले आणि आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्याचा मसुदा बनवण्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला मदत केली. फ्रान्स नाझी आक्रमणातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी राजनैतिक सेवाक्षेत्र पत्करून अनेक महत्त्वाची पदं भूषवली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्यांनी नंतरच्या काळातही सोडलं नाही. आफ्रिकेतल्या हुकूमशहांना पाठिंबा देऊन फ्रेंच सरकार कशी दीर्घकाल गोत्यात आणणारी धोरणं राबवत आहे यासंबंधी त्यांनी लिहिलेला अहवाल तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष मितराँ यांनी दडपून टाकला; त्याचे परिणाम आजही फ्रान्स भोगत आहे. हेसेल यांची आई ही फ्रॉन्स्वा त्रूफोच्या `ज्यूल अँड जिम' या जगप्रसिद्ध चित्रपटातल्या प्रमुख स्त्री व्यक्तिरेखेमागची प्रेरणा होती. अशा माणसाची जीवनकहाणी खचितच रोचक असेल, पण ९३व्या वर्षी त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक वेगळ्याच विषयावर आहे. "Indignez-vous!" ("चिडून उठा!") नावाचं हे पुस्तक म्हणजे ४००० शब्दांचा एक निबंध आहे. आजच्या तरुणांना उद्देशून केलेलं हे निवेदन आहे. हे पुस्तक फ्रान्समध्ये आज लाखोंच्या संख्येनं खपतं आहे. अनेक परकीय भाषांतही त्याचे अनुवाद होत आहेत. असं काय या पुस्तकात आहे?

पुढे वाचा:




पूर्वप्रसिद्धी - 'बोंजूर' १४ जुलै २०११ (फ्रान्स मित्र मंडळ, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित होणारं नियतकालिक)

23 June 2011

`हिरोशिमा माय लव्ह' - कथा आणि वास्तव यांच्यातलं नवं नातं



१९५९ हे वर्ष सिनेमाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरलं. या क्रांतीचा उगम फ्रान्समध्ये झाला. या काळात बनलेल्या फ्रेंच चित्रपटांनी सिनेमाला नवीन भाषा दिली; जुने नियम मोडले आणि नवीन पायंडे पाडले. चित्रपटाच्या इतिहासातला हा महत्त्वाचा टप्पा `फ्रेंच न्यू वेव्ह' या नावानं ओळखला जातो. फ्राँस्वा त्रूफोचा 'फोर हंड्रेड ब्लोज', जाँ-ल्यूक गोदारचा `ब्रेथलेस' हे १९५९ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट `फ्रेंच न्यू वेव्ह'चे प्रवर्तक होते. `न्यू वेव्ह'बद्दल गोदारच्या शब्दांत सांगायचं झालं तर `न्यू वेव्हनं कथा आणि वास्तव यांच्यात नवं नातं निर्माण केलं.' याच उक्तीचा अनुभव देणाऱ्या आलँ रेनेच्या `हिरोशिमा माय लव्ह' या १९५९मध्येच आलेल्या आणखी एका महत्त्वाच्या चित्रपटाची या लेखात ओळख करून दिली आहे.

रेनेनं त्याआधी व्हॅन गॉघ, पिकासो, गोगँ अशा काही महत्त्वाच्या चित्रकारांवर काही माहितीपट केले होते. नाझींनी जगभरातल्या ज्यूंच्या शिरकाणासाठी बनवलेल्या छळछावण्यांवर १९५५ मध्ये रेनेनं `नाईट अॅन्ड फॉग' हा माहितीपट बनवला. तो सर्वत्र वाखाणला गेला. छळछावण्यांमधलं एकेकाळचं भयावह, कल्पनातीत, दारुण वास्तव आणि दुसरं महायुद्ध संपून काही वर्षं लोटल्यानंतर त्या परिसरात नांदणारी वैराण, नि:स्तब्ध शांतता यांतला विरोधाभास रेनेनं त्यात परिणामकारकरीत्या दाखवला. `हिरोशिमा माय लव्ह'ची बीजं त्यात होती. कुणाला न दिसणाऱ्या जखमा मनात बाळगणारी, आतून उध्वस्त झालेली माणसं (किंवा अख्खे समाज) वरवर पाहता शांत, सरळसोट आयुष्य जगत असू शकतात. सिनेमासारख्या दृश्य माध्यमातून जर अशी माणसं आणि त्यांची परिस्थिती मांडायची असेल, तर ती कोणत्या भाषेत मांडता येईल, याचा शोध रेनेनं `हिरोशिमा...'मध्ये घेतला.

पुढे वाचा:



लेखात ज्याचा उल्लेख आहे ती चित्रपटाची पहिली पंधरा मिनिटं इथे पहाता येतील.

19 February 2011

विकीलीक्स - अराजकतावाद, दहशतवाद, हेरगिरी की निव्वळ वार्तांकन?


२८ नोव्हेंबर २०१० रोजी जगभरातल्या अमेरिकी दूतावासांच्या अडीच लाख केबल्समधली गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांतर्फे जगासमोर उघड होऊ लागली. अनेकांना `विकीलीक्स'च्या अस्तित्वाचा तेव्हा शोध लागला, पण विकीलीक्सचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्यूलिअन असांज याने २००६पासून विकीलीक्समार्फत विविध प्रकारची गोपनीय माहिती उघड केलेली आहे. पाश्चिमात्य देशांनी, विशेषत: अमेरिकेने त्याची वेळोवेळी दखलही घेतलेली आहे. आताच्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा एक फरक मात्र दिसतो आहे : असांजला गौप्यस्फोट करता येऊ नये यासाठी अनेकांनी आता कंबर कसलेली आहे. असांजला आणि त्याच्या विकीलीक्सला जगभरात मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांना संपवण्याचे होणारे प्रयत्न, यांमुळे या सर्व प्रकाराविषयी विविध मते आणि विचार मांडण्याची अहमहमिका लागलेली आज सर्वत्र दिसते आहे. त्या गदारोळात न सापडता थोडे गंभीर मूल्यमापन करण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.

पूर्वप्रकाशन: 'आजचा सुधारक' मार्च २०११

1 January 2011

भालचंद्र नेमाडे यांची हिंदू - एक आकलन


पुष्कळ दिवस 'येते आहे' म्हणून गाजलेली भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही महाकादंबरी अखेर २०१० साली प्रकाशित झाली. 'कोसला'चे लेखक म्हणून नेमाडे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य मराठी वाचकवर्गालाही परिचित आहेत. नेमाड्यांच्या लौकिकाला साजेशी आणि सध्याच्या प्रसिद्धीसंस्कृतीशी इमान राखून प्रकाशकांनी कादंबरीची पुष्कळ 'पब्लिसिटी' केली. हातोहात प्रती खपल्या. त्यानंतर मराठी वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी, आंतरजाल अशा अनेक ठिकाणी अनेकांनी कादंबरीविषयी बऱ्यावाईट प्रतिक्रिया दिल्या. अभिनिवेशी नेमाड्यांच्या अभिनिवेशी कादंबरीबद्दल आलेल्या अनेक प्रतिक्रियाही तशाच अभिनिवेशी होत्या. नेमाड्यांची मतं पटतात म्हणून कादंबरीला दशकातली महत्त्वाची कादंबरी म्हटलं गेलं, किंवा ती पटत नाहीत म्हणून कादंबरीला झोडलं गेलं. एक साहित्यकृती म्हणून 'हिंदू'चं विश्लेषण त्यांत अभावानंच आढळलं. आपल्या सध्याच्या राडेबाज संस्कृतीला साजेसे 'नेमाड्यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही' असे असहिष्णू, साहित्यबाह्य प्रकारही झाले. हे सर्व टाळत, कादंबरीचं साहित्यमूल्य तपासून पाहत, कादंबरीचा आशय आणि त्याचा घाट यांचा परस्परसंबंध लक्षात घेत केलेलं हे कादंबरीचं विश्लेषण:


पूर्वप्रकाशन: परिवर्तनाचा वाटसरू (जाने. १-१५ २०११)

13 December 2010

अल्बर्ट काम्यू - नोबेल भाषण


४ जानेवारी १९६० ला एका मोटार अपघातात आल्बेर काम्यूचा अकाली मृत्यू झाला. अवघ्या ४४व्या वर्षी नोबेल पुरस्कार आणि वयाची पन्नाशी गाठायच्या आत मरण पावलेल्या काम्यूचं हे पन्नासावं स्मृतीवर्ष आहे. नोबेल पुरस्कार स्वीकारताना काम्यूनं जे मनोगत व्यक्त केलं होतं, त्याचं मूळ फ्रेंचमधून केलेलं भाषांतर त्या निमित्तानं मी केलं होतं. ते इथे देत आहे. सत्य आणि स्वातंत्र्य यांना का महत्त्व द्यायचं ते सांगताना काम्यूची जीवनदृष्टी त्यात प्रतिबिंबित झाली आहे. कलेविषयीची आणि लेखकाच्या बांधीलकीविषयीची त्याची भूमिका त्यानं यात स्पष्ट केली आहे.